आधी ताणून धरलं, नंतर समेट! ‘या’ ३ कारणांमुळे शिंदे अखेर सत्तेत सामील, टाळला ‘हा’ संभाव्य धोका

पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावत आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

विशेष म्हणजे शिंदेंच्या शपथविधीवर निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला असून, त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्यावर आमदारांचा दबाव होता. त्यांच्या आग्रहाला शिंदेंनी अखेर मान दिली. यामागे तीन महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

जर शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद दुसऱ्या कोणाला दिलं असतं, तर शिवसेनेत नाराजी निर्माण झाली असती. त्यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं, पण घराणेशाहीच्या टीकेचा धोका असल्याने हा पर्याय टाळण्यात आला. तसेच, इतर वरिष्ठ नेत्यांना हे पद दिल्यास पक्षात सत्ताकेंद्राची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता होती.

एकनाथ शिंदेंनी जून २०२२ मध्ये शिवसेनेत मोठं बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेच्या नेतृत्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणं म्हणजे त्यांच्या राजकीय वर्चस्वाचं कायम राखणं असं मानलं जात आहे.

महायुती सरकारमध्ये शिंदे भाजप आणि शिवसेनेत समन्वय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अजित पवार यांच्या आगमनानंतर काही शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी दिसली होती, पण शिंदेंनी यावर तोडगा काढत पक्षात स्थिरता राखली. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी असलेले चांगले संबंध शिंदेंना सत्तेत महत्त्वाचं स्थान देतात. त्यामुळे त्यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड हा सर्वांनाच अनुकूल ठरणारा निर्णय मानला जात आहे.