राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्यामुळे बिथरला शिंदे गट; भडकेल्या शिंदेंनी उचलले सर्वात मोठे पाऊल

अजित पवार सरकारमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपवरील नाराजी वाढताना दिसत आहे. सीएम शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे वृत्त आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत ते आपल्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होती. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मंगळवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचल्या. मुख्यमंत्री शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

यादरम्यान त्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील दीक्षांत समारंभासह इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे सीएम शिंदे राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मंगळवारी नागपुरात पोहोचले, मात्र काही वेळाने ते राजधानी मुंबईत परतले. मात्र, राष्ट्रपतीही मुंबईला पोहोचणार असून, विमानतळावर त्यांचे स्वागत केल्यानंतर शिंदे त्यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहेत.

बुधवारी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना नेत्यांची भेट घेऊ शकतात. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर 8 आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली. महाराष्ट्र सरकारमधील कथित अंतर्गत तणाव लवकर शांत झाला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

वास्तविक, रविवारी शपथ घेतलेल्या सर्व 9 मंत्र्यांचे आपापल्या भागात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांशी तणाव आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे किमान 9 आमदार थेट भाजपच्या विरोधात रिंगणात होते, तर राष्ट्रवादीचे 3 आमदार शिवसेनेच्या विरोधात उमेदवार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना आपली प्रतिष्ठा गमवावी लागण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे, कारण बहुतांश नवीन आमदारांची महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गजांमध्ये गणना होते. अशा परिस्थितीत त्यांची अवस्था महाविकास आघाडीसारखी होण्याची भीती शिंदे सेनेला आहे. याप्रकरणी अनेक मंत्री आणि आमदारांनीही शिंदे यांच्यासमोर आपली नाराजी नोंदवल्याचे वृत्त आहे.