विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता राज्याच्या सत्तेत सामील झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासोबत ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण अजूनही कोणाला खातेवाटप करण्यात आलेले नाही.
तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून खातेवाटपही केली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळावर आणि खातेवाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला वर्षावर चर्चा होत आहे. गेल्या गेल्या काही दिवसांपासून दोन्ही उपमुख्यमंंत्री शिंदेंसोबत चर्चा करत आहे.
अशात वर्षा बंगल्यावर सलग दुसऱ्या दिवशीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. तब्बल दोन तास ही बैठक चालली होती. आधीच्या बैठकीत घेतलेले निर्णयावर या बैठकीत पुन्हा चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रात्री ११ वाजता ही बैठक सुरु झाली होती. तर ही बैठक रात्री १ वाजता संपली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
होणाऱ्या मंत्रिमंडळात शिवसेना-भाजपच्या कोणत्या आमदाराला मंत्रिपद द्यायचं, तसेच त्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं यावर सविस्तर चर्चा झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या ज्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, त्यांना कोणतं खातं द्यायचं यावरही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवारांना अर्थखातं दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. पण अर्थखातं अजित पवारांना दिलं तर शिंदेंचे मंत्री नाराज होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला गेला होता. पण अर्थखातं अजित पवारांनाच दिलं जाणार आहे हे ठरलं आहे. असे असले दुसऱ्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यामुळे या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालला आहे.
दरम्यान, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे चर्चा करत असताना अचानक एका आमदाराने एंट्री घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येणारे हे आमदार शिंदे गटातील दिलीप लांडे होते. पण त्यांना या बैठकीबाबत काहीही माहिती नसून ते आपल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरु होती. मला माझ्या विभागासंबंधी मुख्यमंत्र्यांशी काही काम होते. मी आतमध्येच होतो. त्यांची बैठक झाल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली, असे दिलीप लांडे यांनी म्हटले आहे.