बुलढाण्यातील शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात मतदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. जयपूर गावातील कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना गायकवाड यांनी मतदारांवर कठोर शब्दात टीका केली.
गायकवाड मतदारांना मटण, दारू आणि दोन हजार रुपयांत विकले गेले असे संबोधून अपमानित केले आणि शिवीगाळ करत, “यांच्यापेक्षा रांX बऱ्या” असेही वक्तव्य केले. एकीकडे हा आमदार मतदारसंघाचा विकास करायला निघालाय. लेकी-बाळांचे कल्याण करायला निघालाय. दुसरीकडे हे लोक म्हणतात की संजय गायकवाडला पाडा.
समजा मी पडलो असतो तर झाले असते का प्रोजेक्ट पूर्ण? माझं चॅलेंज आहे एक खडाही नसता पडला. आज एकट्या जयपूर गावासाठी मी 24 कोटीची कामं केली. विकासकामांसाठी आणलेली आकडेवारी पाहिली तर तुमचे डोळे फिरतील.
आमदार संजय गायकवाडांनी यावेळी कोणत्या गावाला किती निधी आणला याची यादीच वाचून दाखवली. पण हे करत असताना मात्र त्यांनी आपल्या भाषेची पातळी मात्र घसरवली. खासगीत नव्हे तर जाहीर भाषणात त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली.
गायकवाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून त्यांनी निवडणुकीनंतर मतदारांबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचे उघड झाले आहे. गायकवाड यांनी कार्यक्रमात जयपूर गावासाठी 24 कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगितले आणि मतदारांनी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीच्या काळात मतदारांना विनम्रपणे राजा म्हणून त्यांच्या पाया पडणारे नेते निवडणुकीनंतर मात्र त्यांचे खरे रूप दाखवतात, असा आरोप या घटनेनंतर मतदारांकडून होत आहे. गायकवाड यांच्या भाषणाने मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून, राजकीय वर्तुळात या प्रकरणाची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.