Lalit patil : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला, अशी माहिती समोर आली आहे.
या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ससूनमधून चालणाऱ्या तस्करी प्रकरणी कांबळेला आरोपी करण्यात आले आहे. त्यासंबंधीचे कलम लावण्यात आले होते.
अॅड. कांबळे आणि अर्चना निकम या दोघींना पोलिसांनी अटक केली होती. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक केली. ललित पाटीलने रुग्णालयातून पळून गेल्यानंतर नाशिकला जाऊन दोघींची भेट घेतली होती.
यावेळी त्यांनी २५ लाख रुपये हस्तांतर केल्याचे समोर आले आहे. कांबळे हिला एनडीपीएस अंतर्गत आरोपी करण्यासंदर्भातील माहिती तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याशी अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत आहेत. आता नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. शहरातील शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे.
ललित पाटील नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत होता. दोन राजकीय पक्षांमध्ये त्याने काम केले आहे. जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत त्याने त्याकाळात शिवसेनेत प्रवेश देखील केला होता.