राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट हा अजित पवारांचा आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गट मात्र नाराज असल्याची चर्चा आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण राष्ट्रवादीशीच आता युती करावी लागल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहे. तसेच ते आमदार आता पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने चक्क याबाबत विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. जे सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
सुब्रमण्यम स्वामींनी शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट का पुन्हा ठाकरे गटाकडे जाईल याचे कारणही स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
मी मुंबईत आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतात. कारण मोदींनी त्यांचा आधी वापर केला आणि नंतर त्यांना बाजूला सारले. आता राष्ट्रवादीला महत्व दिले जात आहे. त्यामुळे आमदार अस्वस्थ झाले आहे, असे मी ऐकले आहे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
आता भाजप खासदारानेच इतके मोठे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. बहुमताचा आकडा असताना राष्ट्रवादीला सोबत घ्यायची गरज नव्हती, असे शिंदे गटातील आमदार म्हणताना दिसत आहे. तसेच आता हातातील मंत्रिपदंही जाण्याची शक्यता असल्यामुळे शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे.