भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा मैदानावरच अपमान करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या सामन्यानंतर भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वर्तणुकीवर टीका केली आहे.
तिसऱ्या दिवशी भारतीय संघ फक्त १५७ धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६२ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियाने केवळ चार विकेट्स गमावून हे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि मालिका ३-१ ने जिंकली.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ही मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी भारताकडे असलेली ही ट्रॉफी यावेळी ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला ट्रॉफी देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ॲलन बॉर्डर उपस्थित होते.
मात्र, या ट्रॉफीचे नाव सुनील गावस्कर यांच्या नावावरही असल्याने, त्यांना व्यासपीठावर बोलावले गेले नाही, यामुळे अनेक चाहते संतापले आहेत. पारितोषिक वितरण समारंभात सुनील गावस्कर मैदानात असतानाही त्यांना व्यासपीठावर बोलावले न गेल्याचे पाहून क्रिकेटप्रेमींनी ऑस्ट्रेलियावर कडाडून टीका केली आहे.
क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ मानला जात असताना, ऑस्ट्रेलियाच्या या वर्तनामुळे जगभरातील क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. जर ऑस्ट्रेलियाने गावस्कर यांनाही सन्मानाने व्यासपीठावर बोलावले असते, तर कोणतीही टीका झाली नसती, असे चाहत्यांचे मत आहे.