किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ मागे भाजपचाच हात; सुषमा अंधारेंनी थेट लॉजिकच सांगितलं

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी महिलांवर अत्याचार केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे आता विरोधकही आक्रमक होताना दिसत आहे.

किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अशात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर वक्तव्य केलं आहे. सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात भाजपचाच हात असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या हे विरोधकांवर खुप आक्रमक होत असतात. ते अनेकदा नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करत असतात. त्या नेत्यांची चौकशी देखील सुरु आहे. पण आता त्यांच्यातील काही नेते हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

भाजपने किरीट सोमय्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांवर बेछुट आरोप केले होते. ते सगळेच लोक आता भाजपमध्ये सामील झाले आहे. पण त्यांचे चारित्र्य चांगले असल्याचे दाखवण्यासाठी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना उघडे पाडणे ही भाजपचीच गरज आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या हे धुतल्या तांदळाचे नक्कीच नाही. मागे एकनाथ खडसे म्हणाले होते की माझ्यावर ईडी लावण्याऱ्यांच्या सीडी माझ्याकडे आहेत हा संदर्भही तितकाच महत्वाचा आहे. पण हा मुद्दा थोडा वेगळा आहे. कारण सोमय्यांचा व्हिडिओ हा आत्ताच व्हायरल होण्याचे कारण काय आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच भाजप महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरला आहे. आमदार खरेदी विक्री, पक्ष फोडाफोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपने सोमय्यांचा हा व्हिडिओ व्हायरल केला आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.