विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना मागच्या वेळचा विजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. यजमान भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. यानंतर अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. आता विश्वचषकात दोन्ही संघांमधील स्पर्धा खूपच चुरशीची होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाने ५ वेळा तर भारताने २ वेळा विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियन संघ चेपॉक मैदानावर खेळण्यास उत्सुक असेल, कारण या मैदानावरील त्यांचा विक्रम उत्कृष्ट आहे. त्यांनी या मैदानावर आतापर्यंत 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 5 जिंकले आहेत.
2017 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाला आपला एकमेव पराभव स्वीकारावा लागला होता. 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले तर भारताने एक सामना जिंकला. या मैदानावर दोन्ही संघांमधील अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 12 सामने झाले आहेत. यापैकी भारताला फक्त 4 सामने जिंकता आले. चेन्नईच्या या मैदानावर भारताने 14 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
त्यापैकी 7 जिंकले आणि 6 पराभूत झाले. चेपॉकच्या मैदानावर फिरकीपटूंना मदत मिळते आणि भारताकडे रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादवसारखे स्टार फिरकीपटू आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे अॅडम झम्पा आणि तन्वीर संघा हे दोन फिरकी गोलंदाज आहेत.
एमए चिदंबरम स्टेडियमची स्थापना 1916 मध्ये झाली. 1934 मध्ये सीके नायडू यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि भारतीय संघ येथे कसोटी सामना खेळला होता. भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिला रणजी सामना याच मैदानावर खेळला गेला.
या मैदानावर १९५१-५२ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला होता. सुनील गावस्कर यांनी 1983 मध्ये याच मैदानावर आपले 30 वे कसोटी शतक झळकावले होते. फिरकीपटू नरेंद्र हिरवाणीने या मैदानावर पदार्पणाच्या कसोटीत 16 बळी घेण्याचा विक्रम केला होता. या मैदानावर वीरेंद्र सेहवागने आपले दुसरे त्रिशतक झळकावले होते.