Thane News : ठाण्यात १९ वर्षीय तरुणीने ३१ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं, कारण ऐकून सगळेच हळहळले…

Thane News : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी उत्तरप्रदेश येथून नातेवाईकाकडे घरकाम आणि शिक्षणासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीने ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारतआत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

याबाबत तपास सुरू आहे. गावावरून शहरात आल्यानंतर येथे मन रमत नसल्याने तिने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

वर्षा उपाध्याय तिच्या नातेवाईकांकडे उत्तरप्रदेश येथील मूळ गावावरून राहण्यास आली होती. अकरावीचे शिक्षण घेत वर्षा नातेवाईकाच्याच घरी घरकाम करत होती. काही दिवसांपूर्वी तिने गावी आईला फोन करून याठिकाणी राहण्याची इच्छा होत नसल्याचे सांगितले होते.

असे असताना तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. उज्ज्वल भविष्य आणि उत्तम शिक्षणासाठी तिकडेच राहा, अशी तिची आईने समजूत काढली होती. यामुळे ती नाराज होती. तिने घटनेदिवशी आई आणि मामाला फोन केला होता. नंतर तिने घरातील बाल्कनीत येऊन थेट खाली उडी मारत जीवन संपवले.

ही घटना घरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून तिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. मृत वर्षा हिच्या घरची परिस्थिती बेताची असून गावी तिच्या दोन लहान बहिण व आई राहते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुटूंबावर दुःख कोसळले आहे.

दरम्यान, याठिकाणी तिच्या अभ्यासासाठी नातेवाईकांनी पुस्तके आणली होती. खासगी शिकवणी घेणाऱ्या या नातेवाईकांकडे तिचे शिक्षण सुरु होते. मानसिक विवंचनेतूनच तिने जीवन संपवले.