1400000000… महाराष्ट्रात सर्वात मोठा GST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट अन्…

GST : महाराष्ट्रात सर्वात मोठ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे CGST आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 140 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी पावत्यांचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणात 26.92 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा छडा लागला असून, कपाडिया महमद सुलतान या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
बनावट कंपन्यांचा वापर करून घोटाळा
तपासानुसार, सुलतान याने 18 बनावट कंपन्या तयार करून फसवणुकीचे नेटवर्क उभे केले. यामध्ये रॉयल एंटरप्राइझ, सरस्वती एंटरप्रायजेस, लुकास इन्फ्राट्रेड एलएलपी आणि मारुती ट्रेडिंग यांचा समावेश आहे.
हा घोटाळा करण्यासाठी, सुलतानने विविध व्यक्तींचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि केवायसी कागदपत्रांचा गैरवापर केला. या कागदपत्रांचा वापर करून बनावट जीएसटी नोंदणी आणि बनावट बँक खाती उघडण्यात आली.
फसवणुकीची कबुली आणि अटक
CGST कायद्याच्या कलम 70 अंतर्गत घेतलेल्या जबाबात सुलतानने फसव्या ITC व्यवहारांची कबुली दिली. त्यानंतर कलम 69 आणि कलम 132 च्या उल्लंघन प्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
11 फेब्रुवारी 2025 रोजी ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याला हजर करण्यात आले, ज्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर सहभागी व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.