Mortuary : रुग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर कुटुंबीय त्यांना घेऊन जाईपर्यंत तो मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला जातो. या मृतदेहांच्या मध्ये राहून शवागारात काम करणे यासाठी मोठे धाडस लागते.
त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांना धाडसी समजलं जातं. पण, जर शवागारात कधी एखाद्या मृतदेह अचानक जिवंत झाला तर भल्याभले हादरुन जातात. ब्राझिलच्या साओ जोस प्रादेशिक रुग्णालयात असेच काहीसे घडले.
९० वर्षीय नॉर्मा सिल्वेरा दा सिल्वा यांचा २५ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबीय घरी घेऊन जाईपर्यंत त्यांचा मृतदेह हॉस्पिटलच्या शवागारात एका पिशवीत ठेवण्यात आला होता.
मात्र, काही तासांनंतर शवागारातील कर्मचाऱ्याने बॅग उघडताच नॉर्माचा श्वासोच्छवास सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ मृतदेह पुन्हा डॉक्टरांकडे नेला. येथे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली नॉर्मा दोन दिवस जिवंत राहिली परंतु त्या बेशुद्ध होत्या आणि २७ नोव्हेंबर रोजी अखेर त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे नॉर्मासाठी दोन मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलचे अधिकारी, ब्राझिलचे मेडिकल एथिक्स कमिटी आणि डेथ कमिशन याचा तपास करत आहेत की त्या जिवंत असूनही त्यांना शवागारात कसे पाठवले गेले.
नॉर्माची मैत्रिण जेसिका मार्टिन्स सिल्वी परेरा म्हणाली की, नॉर्माचे कुटुंब आता हॉस्पिटलविरोधात याचिका दाखल करण्याची योजना आखत आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे घडला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जेव्हा बॅग उघडली तेव्हा नॉर्मा अत्यंत हळूवारपणे श्वास घेत होती. ती शुद्धीत नसल्यामुळे, तिला मदतीसाठी हाक मारता आली नाही, तिने श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि वेदनेने विव्हळत राहिली.
रात्री ११:४० ते १:३० पर्यंत तिला मृत घोषित केल्यापासून ती बॅगमध्ये गुदमरत होती, असं जेसिका म्हणाली. तसेच, नॉर्माच्या कुटुंबीयांना अद्याप मृत्यूचे कारण सांगण्यात आलेले नाही, असंही तिने सांगितले.