तुम्ही लोकांना सीपीआर(CPR ) देताना किंवा तोंडाने श्वास देताना पाहिले असेल. अनेक वेळा अशाप्रकारे वेळीच उपचार करून लोकांचे प्राण वाचवले जातात. मध्य प्रदेशात एका पोलिसाने सीपीआर देऊन सापाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटू शकते, परंतु लोक या पोलिसाच्या धैर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून साप वाचवण्याचे काम करत असून आतापर्यंत शेकडो सापांचे प्राण वाचवले असल्याचे पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सेमरी हरचंद चौकी भागातील आहे. हा साप एका पाइपलाइनमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. साप काढण्यासाठी लोकांनी पाण्यात कीटकनाशक मिसळले होते.
कीटकनाशक शरीरात गेल्याने साप बेशुद्ध झाला होता. कॉन्स्टेबल अतुल शर्मा हे सापाच्या बचावासाठी तवा कॉलनीत पोहोचले तोपर्यंत साप बेशुद्ध अवस्थेत पोहोचला होता. अतुल शर्मा यांनी सांगितले की, घाणेरडे आणि विषारी पाणी शरीरात गेल्याने साप बेशुद्ध झाला होता.
अतुल शर्मा सापाला हातात घेऊन त्याचा श्वास तपासत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग ते तोंडातून वारंवार श्वास देऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. वारंवार सापला श्वास देऊन आणि शरीरातील घाण पाणी काढून टाकल्यानंतर, साप पुन्हा शुद्धीवर येतो आणि झुडपात पळून जातो.
अतुल शर्मा यांनी सांगितले की, ते 2008 पासून साप वाचवण्याचे काम करत आहेत. ते सांगतात की आत्तापर्यंत 500 हून अधिक सापांना वाचवलं आहे पण सीपीआर देऊन साप वाचवण्याची ही पहिलीच वेळ आहे.