‘मला सोडा, ती विनवनी करत होती, पण तो मात्र..’; कोर्टात पोलिसांनी सांगितला घटनाक्रम, तर आरोपीचे वकील म्हणाले…
पुणे: स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये घडलेल्या 26 वर्षीय तरुणीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला शुक्रवारी रात्री स्थानिकांच्या मदतीने अटक करण्यात आली. गुनाट या गावातून रात्री दीडच्या सुमारास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याला शिवाजी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर, न्यायालयाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने आरोपीला तिच्या सुटकेची विनंती केली होती, मात्र आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली. तर, आरोपीच्या वकिलांनी यावर दावा केला की, दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते.
आरोपीचे वकील पुढे म्हणाले की, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही बसमधून बाहेर आलेले दिसतात. या युक्तिवादानंतर न्यायालयात प्रकरणाची मोठी चर्चा रंगली. तपास अधिकारी नांद्रे यांनी घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, पीडित तरुणी मूळगावी जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवर आली होती, तेव्हा आरोपीने तिला ‘ताई कुठे जायचं आहे?’ असं विचारत, कंडक्टर असल्याचा दावा करत तिला बस दाखवली.
बसमध्ये प्रवासी असल्याचे सांगितले असले तरी, बस रिकामी होती. पीडितेने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने तिला जबरदस्तीने अडवून मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला. आरोपीच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून, तो मोबाईल बंद करून फिरत होता, अशी माहिती त्यांनी दिली.
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या युक्तिवादात त्यांनी दावा केला की, शारीरिक संबंध दोघांच्या सहमतीने झाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित स्वतःहून बसमध्ये चढल्याचे आणि आरोपी त्यानंतर बसमध्ये गेल्याचे दिसते. तसेच, आरोपीच्या चेहर्याचा प्रसार झाल्याने टीआयपीचा मुद्दा आता लागू होत नाही, असे वकीलांनी सांगितले. आरोपीवर दाखल असलेले गुन्हे सिद्ध न झाल्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.