दोन दिवसांपूर्वी पुण्यात खुनाची धक्कादायक घटना समोर आली होती. विजय ढूमे नावाच्या व्यक्तीचा लोखंडी गज आणि फावड्याने सपासप वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस तपास करत होते.
आता याबाबत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. सिंहगड पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्याच्याच प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने विजय ढुमेचा खून केला आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपसाले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांना पकडले. ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाताची चौकशी करण्यात आली. तिनेच नवीन प्रियकर संदीप दशरथ तुपे याच्यासोबत ढुमेच्या हत्येचा कट रचल्याचे समजले.
ढुमेचा वारंवार होत असलेला त्रास आणि नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे सुजाताने नवीन प्रियकर तुपेसोबत ढुमेच्या खुनाचा कट रचला. यातून ही घटना घडली आहे.
सिंहगड रोड परिसरातील क्वालिटी लॉजजवळ सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. क्वालिटी लॉजमधून बाहेर आल्यावर पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी गज आणि फावड्याने हल्ला केला.
ढूमे हे रक्तच्या थारोळ्यात पडले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. विजय ढूमे हे एका सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. तसेच त्यांचे अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींशी चांगले मैत्रीचे संबंध आहेत.
या खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले होते. याबाबत सुजाता समीर ढमाल (रा. किरकटवाडी), संदीप दशरथ तुपे (वय २३, रा. राहू, इंदापूर), सागर संजय तुपसुंदर (वय १९ रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (२८, उंड्री पिसोळी) आणि त्यांच्या अजून एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.