Crime News : ह्रदयद्रावक! भरधाव टिप्परने बहिण भावाला चिरडले; गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू, भंडार्‍यामध्ये भीषण घटना

Crime News : भंडार्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव टिप्परने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलीम शेख (३५) व त्यांची गर्भवती बहिण अफसाना शेख (३०) हे दोघे दुचाकीवरून घराकडे निघाले होते. राजीव गांधी चौकात पोहोचले असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या टिप्परने जोरदार धडक दिली.

या धडकेत अफसाना शेख यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कलीम शेख यांच्याही हाताला व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. संतप्त नागरिकांनी रस्ता रोको करून वाहतूक थांबवली होती. यावेळी संतप्त नागरिकांनी टिप्परची तोडफोड करीत पेटवण्याचा प्रयत्न केला.

भंडारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली आणि नागरिकांना त्यापासून रोखले. भंडारा पोलिसांमुळे संतप्त जमावावर नियंत्रण मिळण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेचा अधिक तपास भंडारा पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे दीड तासानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.