तामिळनाडूमधील कुन्नूरमधील मारापलमजवळ पर्यटक बस खड्ड्यात पडल्याने 35 जण जखमी झाले तर 8 जणांचा मृत्यू झाला. ही बस उटीहून मेट्टुपालयमला जात होती. बसमध्ये 55 प्रवासी होते. जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिक लोक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि जखमींचा बचाव आणि मदतकार्यासाठी धाव घेतली. या घटनेबाबत कोईम्बतूर झोनचे डीआयजी सरवना सुंदर म्हणाले की, या अपघातात सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात समोर आले आहे की, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले होते, त्यामुळे बस कुन्नूरजवळील मारापलम येथे 100 फूट खोल दरीत कोसळली.
शनिवारी तामिळनाडूमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळून तीन महिलांसह किमान आठ जण ठार झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी कुन्नूर सरकारी रुग्णालयाचे सहसंचालक पलानी सामी यांनीही 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली.
ते म्हणाले, मृतांमध्ये तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.