Nagpur News : थंडी घालवण्यासाठी शेकोटी पेटवणे पडले महागात, दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

Nagpur News : नागपूर शहरातून एक वाईट बातमी समोर आली आहे. हजारीपहाड परिसरात आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. गोरखेडे कॉम्प्लेक्सजवळील झोपडीत लागलेल्या या आगीत दिवांश रणजित उईके (वय ७) आणि प्रभास रणजित उईके (वय २) या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र, आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंदाजे रात्री नऊच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

गोविंद घोरपडे कॉम्प्लेक्सजवळील आऊटहाऊस सारख्या घरात आई, एक मुलगी आणि दोन मुले राहत होती. सध्या नागपुरात थंडीचे वातावरण आहे. त्यामुळे हात शेकण्यासाठी घरात आग पेटवण्यात आली होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेच्या वेळी घरात आई आणि तीन मुले होत्या. आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात दिवांश आणि प्रभास या दोन मुलांसह त्यांची मोठी बहीण होती. अचानक घरात आग लागली आणि दोन लहान मुले घरात अडकून पडल्या. मोठी बहीण आगीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाली.

आग लागल्याची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग फारच जोरदार होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे नागपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.