Uddhav Thackeray : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. दिशाच्या वडिलांनी या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली असून, त्यांच्या वतीने वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे कुटुंबावर थेट आरोप केले.
वकील ओझा यांच्या मते, त्या काळात मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. “आदित्य ठाकरेंनी केलेल्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी उद्धव ठाकरे सक्रिय होते,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, याप्रकरणात तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
ओझा यांनी सांगितले की, या प्रकरणात आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली, त्यांचे अंगरक्षक, तसेच रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक जण आरोपी आहेत. पोलिसांनी या सर्वांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, आदित्य ठाकरे यांचे या प्रकरणाशी संबंध असल्याचे अनेक पुरावे असल्याचा दावाही वकील ओझा यांनी केला. “घटनेच्या वेळी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी होते का? आणि दिशाचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात होता का?” या दोन गोष्टी सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे भरपूर प्रत्यक्षदर्शी आहेत, असे ते म्हणाले.
तसेच, आदित्य ठाकरेंनी यापूर्वी दिलेली माहिती खोटी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. “त्यांनी सांगितले की त्यांच्या आजोबांचे त्या दिवशी निधन झाले होते, पण प्रत्यक्षात ते जिवंत होते. मोबाईल टॉवर लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींनीही त्यांच्या दाव्याला खोटं ठरवलं आहे,” असे वकील ओझा म्हणाले.
हे प्रकरण अधिक गहिरं होत असताना आता पोलिसांची भूमिका काय असेल आणि या आरोपांवर ठाकरे कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.