बंडखोर आमदार मातोश्रीवर आले तर? उद्धव ठाकरेंनी दिले ‘बाळासाहेब’ स्टाईलने उत्तर म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी त्यांची एक खास मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना संजय राऊतांनी राज ठाकरेंशी युती होणार का? असा प्रश्न विचारला होता.

राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांवरील चर्चा थांबली नसती. ज्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला नाही. त्यामुळे चर्चा थांबली.

तसेच मी प्रस्ताव आला तर गेला तर याचा विचार करत नाही. प्रस्ताव आला तरी मी विचार करत नाही आणि गेला तरी विचार करत नाही. त्याक्षणी काय सुरु असतं. त्याचा विचार करतो. त्यामुळे आता तरी असे काही नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबतही प्रश्न विचारला आहे. शरद पवारांनी लढा देण्यासाठी कायदेशीर मार्ग का निवडला नाही? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला होता. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा माणूस आहे. जशाला तसं उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी कायदेशीर लढतोय. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. त्यांची ती इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच एकनाथ शिंदेंचे आमदार पुन्हा मातोश्रीवर आले तर काय? या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये दिले आहे. ते म्हणाले की, त्यांची हिंमतच नाही येण्याची. आले तर वगैरेचा विषयच नाही. ते मातोश्रीवर येऊच शकत नाही. माझा स्वभाव त्यांना माहितीये, शिवसेनेची म्हणजेच बाळासाहेबांची विचारधाराही त्यांना माहिती आहे.