२ मित्र पवना धरणात उतरले, अंदाज चुकला अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं; पुण्यातील काळिज पिळवटून टाकणारी घटना

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात दोघे तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी, 4 डिसेंबर रोजी घडली. दुपारी दुधिवरे गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुडालेल्या तरुणांची नावे मयूर रविंद्र भारसाके (वय 25) आणि तुषार रविंद्र अहिरे (वय 26) अशी असून, दोघेही पुण्यातील बालेवाडी येथे खाजगी कंपनीत नोकरीला होते.

मूळचे हे दोघेही वरणगाव, भुसावळ येथील रहिवासी आहेत. लोणावळा पोलिसांच्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत असलेले मयूर आणि तुषार बुधवारी सकाळी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते.

दुपारी दुधिवरे गावाजवळ पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याची खोली खूप जास्त असल्यामुळे प्रयत्न अपयशी ठरले.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे. पवना धरणात याआधीही पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत.

प्रशासनाकडून अशा घटनांना रोखण्यासाठी पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याच्या खोलीबद्दल योग्य माहिती नसताना पाण्यात उतरणे टाळावे, अशी विनंती पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने केली आहे.