Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
त्यांच्या मते, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील स्वामी समर्थ आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे दोघे मुक्कामाला होते, आणि 17 तारखेला आश्रमातून बाहेर पडले होते. त्यांनी असा दावा केला आहे की, मागील वर्षी आश्रमात काही अनुचित घटना घडल्या होत्या, ज्याबाबत जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक घेतली होती.
त्या बैठकीत चंद्रकांत मोरे (Chandrakant More) देखील उपस्थित होते. तृप्ती देसाई यांनी असा आरोप केला आहे की, वाल्मिक कराडने मध्यस्थी केली असल्याने त्याला आश्रमात आश्रय दिला गेला असावा. या आरोपांवर स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, CID चे अधिकारी आश्रमात तपासासाठी आले होते आणि त्यांनी केंद्रातील CCTV फुटेज तपासले आहे. फुटेजनुसार, वाल्मिक कराड 16 डिसेंबरला दर्शनासाठी आले होते आणि लगेच निघून गेले होते. ते दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी आले होते, ज्यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
वाल्मिक कराड आश्रमात एकट्याने आले होते, आणि तपासात विष्णू चाटे यांचा उल्लेख नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडे सर्व संबंधित रेकॉर्ड्स आहेत आणि त्यांना पूर्ण माहिती दिली गेली आहे, असे आबासाहेब मोरे यांनी सांगितले.
चौकशीसाठी आम्ही तयार आहोत
तृप्ती देसाई यांनी आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, अशीही माहिती दिली आहे. या आरोपांवर आबासाहेब मोरे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तृप्ती देसाई यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. ते म्हणाले, “लोकशाहीत कोणीही काहीही आरोप करू शकते, याचा अर्थ तो सत्य असेल असे नाही.”
यापूर्वी देखील आश्रमातील एका सेवकावर आरोप झाले होते, मात्र तक्रारदाराने नंतर माफी मागितली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. आम्ही कायद्याच्या मार्गाने सर्व आरोपांना सामोरे जाऊ, आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही आबासाहेब मोरे यांनी सांगितले.