“वाल्मिक कराडचा राईट हॅंड गोट्या गित्ते घरात घुसून पोरींना…”; समाजसेविकेचा धक्कादायक गौप्यस्फोट

बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारी जगतातील अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. नुकत्याच, वाल्मिक कराड प्रकरणात गोट्या गित्तेचं नाव प्रमुखतेने समोर आलं होतं. आता अंजली दमानियांनी गोट्या गित्तेबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

अंजली दमानियांनी एका महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकून देतो असा दावा केला आहे. ही माहिती त्यांनी पोलीस अधिक्षकांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. गोट्या गित्ते हा केवळ एक टपराट चोर नाही, तर तो एक कुख्यात गुन्हेगार आहे ज्याच्यावर गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

या घटनेची नोंद पोलीसही घेत नसल्याचं त्या म्हणाल्या. “हा घरात घुसतो , भीती दाखवून आईवडिलांसमोर मुलींना घेऊन जातो आणि पुन्हा आणून घरात फेकून देतो. हे ऐकलं तेव्हा थरकाप उडाला. अशांवर कारवाई देखील होत नाही. त्याच्याविरोधात पोलीस तक्रार घेत नाहीत”, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला.

गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची कुंडली फार मोठी आहे. त्याने चोरी, लोकांना धमकावणे, गावठी कट्टे बाळगणे यासह हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातही भाग घेतला आहे. त्याच्याकडून 40-40 कट्टे सापडले होते आणि त्याने देहूतल्या तुकोबारायांच्या मंदिरातला मुखवटाही चोरला होता. वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला सीआयडी केज कोर्टात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते होता, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

गोट्या गित्तेच्या माध्यमातून वाल्मिक कराडनं दहशत पसरवली. गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा एक मोहरा म्हणून वापर करण्यात आला. असे अनेक मोहरे वाल्मिक कराडनं जमवले आहेत, ज्यामुळे येत्या काळात बीडमधून अशा अनेक गोट्या गित्तेंची नावं समोर आली तर आश्चर्य वाटायला नको.

ग्यानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या हा मुळ परळी तालुक्यातील नंदागौळचा रहिवासी आहे. गोट्या गित्ते हा बँक कॉलनी परळी येथे राहतो. गोट्या गित्तेवर आतापर्यंत अनेक पोलीस ठाण्यात चोरी, हाफ मर्डर, दरोडे असे गुन्हे दाखल झाले आहेत.