होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण? बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये नोंद, जाणून घ्या…

घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी १२० फूट उंच होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेत ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. १५ हजार चौरस फुटांचे होर्डिंग संध्याकाळी पेट्रोल पंपवर कोसळले.

पोलिसांनी याप्रकरणी फलक लावणारे भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर ३०४,३३८,३३७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त) पुरुषोत्तम कराड यांनी दिली. याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.

भावेश भिंडे सध्या बेपत्ता आहे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हे याच कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. दरम्यान, दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होत्या.

यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी एनओसी घेण्यात आली नव्हती. तसेच पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती.

हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठे असून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद केली गेली होती. यावेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीन घटनेचा थरार सांगितला आहे. यावेळी अंगावर काटा आल्याचे त्यांनी सांगितले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असताना ही दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर एकच आक्रोश सुरु केला. अडकलेल्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला.

ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिथे अमित गुपचंदानी कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या डोळ्यांसमोर भयंकर घटना घडेल याबाबत कोणाच्याही मनात काहीही नव्हते. अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ उडू लागली. मात्र ही घटना घडेल असं कोणाच्याही मनात नव्हते.