ज्याला जायचंय त्यांनी जा, मी एकटा राहील, ठाकरेंची भावनिक साद, ‘मातोश्री’ने झापताच ‘ते’ दोघं…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की, “पक्षात आता ‘चार दिशांना चार तोंडे’ ही स्थिती राहणार नाही.” सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे आणि पक्षाच्या यशासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असा आदेश त्यांनी दिला. “लढू आणि जिंकू” हा मंत्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, जो कुणाला पक्ष सोडायचा असेल, त्यांनी जावे, मी एकटाही राहिलो तरी चालेल, असे म्हणत त्यांनी भावनिक साद घातली.

शेगाव तालुक्यातील सात गावांमध्ये केस गळतीमुळे खळबळ; पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ, आणि घुई या गावांमध्ये ५१ लोकांमध्ये टक्कल पडण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने या समस्येची दखल घेऊन घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले. तज्ज्ञांच्या मते हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा असावा, मात्र तपासणीत पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी सांगितले की, नायट्रेटचे प्रमाण मानकापेक्षा पाचपट अधिक असून, रासायनिक दूषित पाणी आरोग्याच्या समस्या निर्माण करत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची विनंती केली. त्यांनी हिंदुत्वाची भूमिका स्पष्टपणे मांडण्याचा आग्रह धरला. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला पक्षाचे सचिव विनायक राऊत, खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. पदाधिकाऱ्यांनी काँग्रेससोबतची युती तोडून स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आणि पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांना एकत्र राहण्याचे निर्देश दिले.

शनिवारी पदाधिकारी मेळावा; पक्षांतर्गत वादांवर चर्चा होणार

‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर लगेचच खैरे-दानवे यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मेळाव्याचे आयोजन केले. तापडिया नाट्य मंदिरात होणाऱ्या या मेळाव्यात पक्षातील वादांवर चर्चा होणार आहे.