क्राईम

पत्नी सोडचिठ्ठी देत नव्हती, पतीने मांढरदेवीच्या घाटात नेलं अन् केलं धक्कादायक कृत्य, उडाली खळबळ

कौटुंबिक वादामुळे व सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून पत्नीचा मांढरदेवी ते वाई घाटात खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे दिली. मात्र याबाबत पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी तपास करुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक केली आहे. ललिता अमोलसिंग जाधव (वय.३८ रा. फुलगाव ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग मुरली जाधव (वय.२६ रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगांव, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, वयाने मोठी असल्याने तसेच घरच्यांच्या व नातेवाईक यांच्या दबावामुळे आरोपीने मयत ललिता हिच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. तसेच ललिता आरोपीला सोडचिठ्ठी देण्यास तयार नव्हती.

याच कारणावरून आरोपीने पत्नीला संपवण्याचा प्लान केला. आरोपीने पत्नीला मांढरदेवी येथे दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगून तिला मांढरदेवी येथे घेऊन गेला. मात्र त्याच्या डोक्यात सगळा प्लॅन तयारच होता.

दर्शनासाठी जात असताना आरोपीने घाटात कार थांबवून चालकाला मंदिराजवळील पार्कींगमध्ये कार लावून तिथेच थांबवण्यास सांगून ते दोघे घाटातून मंदिराच्या दिशेने पायी चालत गेले.

चालत जात असताना रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने पत्नी ललिता हिला उतारावरुन दरीत ढकलून दिले. मात्र, पत्नी २० फूट अंतरावर असलेल्या झाडाझुडपात अडकली. आरोपीने खाली उतरून झाडाझुडपात अडकलेल्या पत्नीचा साडीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला.

त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह डोंगर उतारावरुन ढकलून दिला. नंतर आरोपीने लोणीकंद पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी बेपत्ता महिलेचा तपास करत असताना आरोपीने तिचा खून करुन मृतदेह डोंगर उतारावरुन फेकून देऊन पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी अमोलसिंग जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Related Articles

Back to top button