Sunita Williams : भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल 9 महिने अंतराळात राहून अखेर पृथ्वीवर परतले आहेत. 19 मार्चच्या पहाटे त्यांचे यान सुरक्षितरित्या पृथ्वीवर पोहोचले. त्यांची परतीची वाट जगभरातील विज्ञानप्रेमी उत्सुकतेने पाहत होते. मात्र, दीर्घ काळ अंतराळात राहिल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक अनेक समस्या भेडसावू शकतात.
अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने उद्भवणाऱ्या समस्या
- ‘वजनहीन जीभ’ (Weightless Tongue)
अंतराळात दीर्घ काळ राहिल्यानंतर अंतराळवीरांना त्यांची जीभ वजनहीन वाटू लागते. यामुळे बोलण्यात अडचण येऊ शकते. हे एक दुर्मिळ पण महत्त्वाचे लक्षण मानले जाते.
- ‘स्पेस अॅनीमिया’ – लाल रक्तपेशींची कमतरता
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या (Microgravity) परिणामामुळे शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. परिणामी, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि ‘स्पेस अॅनीमिया’ (Space Anemia) नावाची समस्या निर्माण होते.
- ‘बेबी फीट’ – पायांच्या संवेदनशीलतेत वाढ
अंतराळात काही महिने राहिल्यानंतर, अंतराळवीरांच्या पायांचे कोल्ड्ज (calluses) निघून जातात आणि पाय अधिक संवेदनशील होतात. यामुळे चालताना त्रास होतो. या स्थितीला ‘बेबी फीट’ असे म्हटले जाते.
- डोळ्यांवर परिणाम
अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे, काही अंतराळवीरांच्या डोळ्यांची दृष्टी धूसर होऊ शकते. पाण्याचा साठा मणक्यात होण्यामुळे दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
- हृदयाच्या कार्यप्रणालीत बदल
अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण हृदयावर परिणाम करते. त्यामुळे परत पृथ्वीवर आल्यानंतर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
- मानसिक ताण आणि ‘ओव्हरव्यू इफेक्ट’
अंतराळवीर जेव्हा दीर्घ काळानंतर पृथ्वीवर परततात, तेव्हा मानसिक तणाव आणि वेगळ्या प्रकारच्या भावनिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. काही अंतराळवीरांना ‘ओव्हरव्यू इफेक्ट’ (Overview Effect) होतो, म्हणजेच त्यांना पृथ्वी अधिक सुंदर, नाजूक आणि संवेदनशील वाटू लागते.
वैद्यकीय तपासणी आणि पुनर्वसनाचा टप्पा
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवरील वातावरणाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी अनेक वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागेल. त्यामध्ये –
हाडांची मजबूती तपासणे
मांसपेशींची ताकद कमी झाली आहे का याचा शोध
हृदयविकाराची शक्यता तपासणे
रोगप्रतिकारक शक्ती किती कमी झाली आहे याचा अभ्यास
अंतराळात 9 महिने राहिल्यानंतर पृथ्वीवर परत येणं हे जितकं आनंददायक आहे, तितकंच शारीरिक आणि मानसिक संघर्षाचंही असतं. आता सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी पूर्ववत जीवनात परतण्यासाठी किती वेळ घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.