२ वर्षांपासून महिला पोलिस गायब, हेड कॉन्स्टेबलची चौकशी करताच धक्कादायक सत्य आलं समोर

हत्येच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने दिल्ली पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबलची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात लपवल्याचा आरोप आहे.

२०२१ मध्ये झालेल्या या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने आरोपीला अटक केल्यानंतर महिलेचा सांगाडा जप्त केला आहे. रिपोर्टनुसार, त्या दोघांचे अफेअर होते आणि महिला कॉन्स्टेबल आरोपीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती.

आरोपी विवाहित होता आणि त्यामुळेच त्याने महिला कॉन्स्टेबलची हत्या केली. ही महिला कॉन्स्टेबल गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता होती. आता गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी सुरेंद्र हा स्वतः दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहे.

2012 मध्ये दिल्ली पोलिसात रुजू झालेला सुरेंद्र विवाहित असून तो आपल्या कुटुंबासह अलीपूरमध्ये राहतो. 2019 मध्ये तो पीडितेला भेटला. मुखर्जी नगरमध्ये राहून ती यूपीएससीची तयारी करत होती. सुरेंद्रने स्वत:ला सिंगल घोषित केले आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

पीडित तरुणी स्वतः दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल झाली होती. 8 ऑगस्ट 2021 रोजी ती अचानक अलीपूरला पोहोचली आणि सुरेंद्रला त्याच्या घरचा पत्ता विचारला. सुरेंद्रला भीती वाटत होती की आपले रहस्य उघड होईल.

फिरण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेला यमुनेच्या काठावर नेले आणि तेथे तिचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर त्याने पीडितेचा मृतदेह नाल्यात गाडून बॅग, फोन आदी वस्तू काढून घेतल्या. आरोपीच्या सांगण्यावरून सांगाडा जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलगी बेपत्ता झाल्यावरच मुखर्जी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तेव्हापासून गुन्हे शाखा चौकशी करत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी सुरेंद्रने डेहराडून, ऋषिकेश आणि मसुरी येथील हॉटेलमध्ये जाऊन पीडितेशी संबंधित गोष्टी सोडल्या, जेणेकरून लोकांना वाटेल की पीडिता स्वतः येथे आली आहे.