Yavatmal News : देवीचा नवस फेडायला जाताना घडलं विपरीत, भयंकर अपघातात 6 जागीच ठार, 12 जखमी…

Yavatmal News : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्यात कोसळले. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

या भीषण अपघातात सहा भाविक जागीच ठार तर, १२ गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण गावाजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

या अपघातातील मृतांमध्ये लीला वसराम चव्हाण, सावित्री गणेश राठोड, ज्योती नागा चव्हाण, उषा विष्णू राठोड, पार्वती रमेश जाधव व वसराम देवसिंग चव्हाण यांचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचे निधन झाले होते.

तसेच राज चव्हाण, आशा चव्हाण, दर्शन पवार, गणेश राठोड, प्रथमेश राठोड, वाहनचालक ज्ञानेश्वर राठोड व इतर सहाजण जखमी झाले. जखमींवर पुसदच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मदतीसाठी अनेकजण धावून आले.

दरम्यान, बेलगव्हाण घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला ते नाल्यात कोसळले. आमदार इंद्रनील नाईक व नीलय नाईक यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

तसेच जखमींना उपचार करण्यासाठी सूचना केल्या आहेत. या अपघातानंतर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबाने एकच हंबरडा फोडला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.