पुरुष पहाटे शपथ घेतात, महिलांनी सकाळी उठून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा थेट शरद पवारांना सवाल

शनिवारी पुण्यातील स्वजोस पॅलेस याठिकाणी संभाजी ब्रिगेड केड कॉन्क्लेव्हचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात शरद पवारांनी तिथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधला होता. तसेच समाजकारण आणि अर्थकारण संंबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. यावेळी एका तरुणीने विचारलेला प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे.

अमरावती जिल्ह्यातून आलेल्या क्षिप्रा मानकर यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला. तसेच जिजाऊ, रमाई, सावित्री, रखमाबाई राऊत, तानुबाई बिर्जे, झलकारीबाई, मुक्ता साळवे यांनी महाराष्ट्राच्या भूमिला न्याय देण्यासाठी खस्ता खाल्ल्या. पण कित्येक सत्ता आल्या आणि गेल्या पण महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही, असे त्या तरुणीने म्हटले आहे.

तरुणीच्या या निर्भिड प्रश्नावर शरद पवारांनी स्मित हास्य केले. इतकंच नाही, तर कानाला हात लावला आणि तरुणीची माफी देखील मागितली. पण त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांनी उत्तर देताना त्यांनी स्वत: आखलेल्या धोरणांची माहिती सांगितली.

आजपर्यंत मुख्यमंत्रिपदी एकही महिला बसली नाही हे खरंय. पण महिलांना विविध क्षेत्रामध्ये कायद्याने अधिकार मिळाला पाहिजे. यासंबंधीचं पहिलं धोरण महाराष्ट्रातच राबवलं गेलं. त्याचा परीणाम नक्कीच झाला आहे. पण तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच झाला आहे हेही खरं आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

नगरपालिका असो वा महानगरपालिका तिथे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात दिसतात. आतापर्यंत आपण निम्मे अंतर गाठले आहे. आता पुढचं अंतरही आपल्याला गाठावं लागणार आहे. तुम्ही सांगताय तसे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील आणि तसे निर्णय घेण्याची आमची तयारीही असेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच माझा पक्ष लहान आहे. पण देशाच्या संसदेत पक्षाच्या तीन खासदार आहे. वंदना चव्हाण आणि फौजिया खान चांगलं काम करताय. सुप्रियाबद्दल मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. पण तिला पाचवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. महिलांना संधी दिली तर त्या नक्कीच भरारी घेतात. भविष्यात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री नक्कीच मिळेल, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच शरद पवारांनी इतके उत्तर देऊनही शेवटी तरुणीने पुन्हा संधी साधली. तिने पहाटेच्या शपथविधीवरुन निशाणा साधला. त्यावेळी शरद पवारही खळखळून हसताना दिसले. पहाटे दोन पुरुष शपथविधी उरकतात, मग आम्ही पहाटे उठून सडा-सारवण करुन फक्त रांगोळ्या काढायच्या का? असा सवाल तिने केला. त्यावेळी शेजारच्या लोकांनीही टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.