तरुण मुलींकडे पाहत टोमणे मारत होता, तरुणींना राग अनावर, मित्राला बोलवलं अन् घडलं धक्कादायक कृत्य

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आली आहे. याठिकाणी एका वादातून हत्येची घटना घडली आहे. टोमणे मारण्यासह एकटक बघितल्याने चाकूने वार करून युवकाची हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन तरुणींसह तिघांना अटक केली आहे. तरुणींना अटक केल्याची ही घटना घडल्याने याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

रणजित बाबुराव राठोड (वय २८, रा. ज्ञानेश्वरनगर) असे मृतकाचे नाव आहे. अटकेतील मारेकऱ्यांमध्ये आकाश दिनेश राऊत (वय २५, रा.हसनबाग), जयश्री दीपक पानझाडे (वय २४) आणि सविता सायरे (वय २४, दोन्ही रा. वाडी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतले होते.

याबाबत माहिती अशी की, रणजितचे किराणा दुकान आहे. रात्री ११.२० वाजताच्या सुमारास रणजित हा महालक्ष्मीनगरमधील पान ठेल्यावर आला. याचदरम्यान कापड खरेदी करुन परत जाताना जयश्री आणि सविताही पान ठेल्यावर थांबल्या.

रणजित हा त्यांना एकटक बघायला लागला. त्याने टोमणे मारले. दोघींनी त्याला जाब विचारला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. जयश्रीने तिच्या ओळखीचा आकाश याला याबाबत माहिती दिली व त्याला याठिकाणी बोलावले. यानंतर मोठा वाद झाला.

यामध्ये रणजित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर आकाश, जयश्री आणि सविता पसार झाले. यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी रणजितचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.

पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन दोन तरुणींसह तिघांना अटक केली. या घटनेने सगळेच हादरले असून पोलीस तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये अशाच धक्कादायक घटना घडत आहेत.