Cough medicine : धक्कादायक! खोकल्याचे औषध पिल्याने ५ जणांनी गमावला जीव; दोघांची प्रकृती गंभीर

Cough medicine : वातावरणातील सततच्या बदलांमुळे अनेकांना सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच विषारी खोकल्याचे औषध पिल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कफ सिरप विकणाऱ्या दुकानदारासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिथाइल अल्कोहोलयुक्त आयुर्वेदिक कफ सिरप सेवन केल्याने या लोकांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती खेडा जिल्ह्यातील नडियादच्या बिलोदरा गावातील रहिवासी आहे.

खोकल्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी एका दुकानातून कफ सिरप घेतले होते. औषध घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे या रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे उपचारादरम्यान दोन दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या नमुन्याच्या चाचणीत या कफ सिरपमध्ये मिथाइल अल्कोहोल आढळून आले.

या घटनेनंतर पोलिसांनी औषध विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 50 हून अधिक लोकांनी त्याच्याकडून औषधे खरेदी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितलेकाही लोक खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली नशा करण्यासाठी कफ सिरपचा वापर करतात. याच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.