काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. अनेक पक्ष आमदार फुटल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामध्ये खरी ताकद कोणाची याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. यामध्ये शरद पवार यांनी अनेक चेहरे गळाला लावायला सुरुवात केली आहे.
आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते समजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश कणार आहेत. हा एक मोठा धक्का भाजपसाठी आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यापूर्वी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का दिला आहे. माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
के. पी पाटील यांनी लोकसभेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला होता. तसेच हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम करणार अशी भूमिकाही त्यांनी यापूर्वी घेतली होती. मात्र त्यांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे, या भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत के पी पाटील म्हणाले, ‘अजित पवार गटामध्ये मी कधी गेलो नाही, मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता. मी पहिल्यापासून राष्ट्रवादीमध्येच आहे. मी कधीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला नाही, त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या भेटीनंतर के. पी पाटील यांनी दिली आहे. यामुळे ते शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे दिसून येत आहे.