भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील सोडणार पक्ष, मुलगा राजवर्धन पाटील यांच्याकडून अधिकृत घोषणा…

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता याबाबत शिक्कामोर्तब झाले असून त्यांचे चिरंजीव नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी अखेर मोबाईलवर स्टेटस ठेवत याबाबत घोषणाच केली आहे.

आता हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

याबाबत राजवर्धन पाटील यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे स्टेटस ठेवल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे. दरम्यान, शरदचंद्र पवार यांच्या पक्षात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रवेश करणार हे अनेक दिवसापासून चर्चा होती.

असे असताना मात्र पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी चर्चेला पूर्णविराम दिला असून त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे आता समोर येत आहे. यामुळे आता अजित पवार यांचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील फेसबुकवर पोस्ट करत असताना भाजपचं कमळ चिन्ह असणारं पोस्टर शेअर करत होते. माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष असल्याचाही उल्लेख करत होते.

तसेच कमळ चिन्हही ते वापरत होते. मात्र आता त्यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये बदल केला आहे. आता माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष असल्याचा उल्लेख ते करत आहेत. मात्र कमळाचं चिन्ह त्यांच्या सध्याच्या पोस्टमध्ये दिसत नव्हता. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली होती.