महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी फोडलं गुपित?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन काही काळ लोटला असला, तरीही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीने बहुमत मिळवले असले तरी मुख्यमंत्रीपद, गृहखाते आणि अन्य महत्त्वाच्या खात्यांचे वाटप यावर अजूनही अनिश्चितता कायम आहे.

नेतेमंडळींच्या चर्चा, बैठकांपलीकडे अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही, ज्यामुळे सत्तास्थापनेसंदर्भात संभ्रम वाढला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे दूर असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या पक्षाच्या मागण्या आणि त्यांची भूमिका यावर चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे गटाने गृहखाते आणि 13 मंत्रीपदांवर ठाम भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या X पोस्टद्वारे एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा गुंता अधिकच वाढल्याचे दिसते.

त्यांनी शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली असून, भाजपच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दमानिया यांच्या मते, भाजप सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाला वापरत आहे आणि शेवटी विरोधी पक्षनेतेपदही शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या उलथापालथी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या सत्तास्थापनेसंदर्भातील हा तिढा पुढे कसा सुटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.