विमानातून फिरताना सापडले 60 वर्षांपूर्वी बर्फात गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल

NASA च्या संशोधकांनी ग्रीनलँडच्या उत्तर भागात 60 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या एका गुप्त शहराचा शोध लावला आहे. हे शहर कॅम्प सेंच्युरी नावाने ओळखले जाते आणि 100 फूट बर्फाखाली गाडले गेले होते. प्रगत रडार उपकरण UAVSAR च्या मदतीने हे शहर सापडले.

संशोधकांच्या मते, हे शहर 1959 साली लष्करी तळ म्हणून उभारले गेले होते आणि 1967 मध्ये ते सोडून देण्यात आले होते. एप्रिल 2024 मध्ये NASA च्या गल्फस्ट्रीम III जेटने ग्रीनलँडच्या बर्फाच्छादित प्रदेशांचे निरीक्षण केले. या मोहिमेदरम्यान, UAVSAR रडारचा वापर करून बर्फाच्या जाडीचा अभ्यास केला जात असताना गुप्त शहराचे अवशेष आढळले.

या शहराचा शोध हवामान बदल आणि समुद्र पातळीवाढीच्या संभाव्य धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.कॅम्प सेंच्युरी हे शहर ग्रीनलँडमधील बर्फाच्या पृष्ठभागाखालील बोगद्यांमध्ये वसवले गेले होते.1967 नंतर येथे कोणीही राहत नसल्याने, बर्फाच्या साचल्यामुळे हे शहर जमिनीत 30 मीटर खोल गेले आहे.

UAVSAR च्या 3D मॅपद्वारे या शहराची रचना, बोगदे आणि लष्करी सुविधा स्पष्टपणे दिसून आल्या. या शोधामुळे शीतयुद्ध काळातील ऐतिहासिक घटनांवर प्रकाश पडत आहे. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामुळे बर्फ वितळल्यास काय परिणाम होतील, याचा अभ्यास करण्यास नवी दिशा मिळाली आहे.

जेपीएलचे संशोधक ॲलेक्स गार्डनर यांच्या मते, या शोधामुळे भविष्यकालीन संकटांची शक्यता लक्षात घेणे शक्य होईल. ग्रीनलँडमधील या रहस्यमय शोधामुळे भूतकाळातील घटना समजून घेण्याबरोबरच, भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीही नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.