भाजपमध्ये का चालले? ‘मातोश्री’वर झाली हायव्होल्टेज बैठक, दोन तासात ठाकरेंनी दिला निकाल, तिघांची पक्षातून हकालपट्टी

पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, आणि पल्लवी जावळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक पावले उचलली आहेत.

विशाल धनवडे आणि बाळा ओसवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे पुण्यातील ठाकरे गटात खळबळ उडाली. पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तिघांची हकालपट्टी करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर पुणे शहर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांबद्दल सविस्तर माहिती घेत त्यांनी पक्षबांधणीसाठी नवे आदेश दिले. “जे गेले, त्यांना जाऊ द्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नव्या उमेदवारांची चाचपणी करा आणि पक्ष मजबूत करा,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सध्या पुण्यात शिवसेनेचे फक्त तीन नगरसेवक – संजय भोसले, पृथ्वीराज सुतार, आणि श्वेता चव्हाण उरले आहेत. संजय भोसले आणि श्वेता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गट सोडणाऱ्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही, मात्र आगामी महापालिका निवडणुकीत अधिक राजकीय संधी मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. ठाकरे गटाने हा धक्का सावरत पक्षबांधणीसाठी नवे प्रयत्न सुरू केले आहेत.