Oath-taking ceremony : खर्गेंसोबतच्या वादानंतर पवार रागाने निघून गेले, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन् म्हणाले…, भुजबळांचा गौप्यस्फोट

Oath-taking ceremony : मंत्री धनंजय मुंडे यांनी २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी षडयंत्राचा भाग होता, असा आरोप केल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली. भुजबळांनी यावर शंका व्यक्त करत, ‘हे षडयंत्र कोणी रचले?’ असा सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी शपथविधीला षडयंत्राचे रूप दिले असताना, छगन भुजबळ यांनी सांगितले की, “धनंजय मुंडे यांचे भाषण ऐकून मी तेथे नव्हतो, पण माध्यमांतून काही ऐकलं.”

भुजबळ यांनी २०१९ मध्ये झालेल्या बैठकीच्या घटनाक्रमाबद्दल सांगितले की, “त्या वेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चांचा सिलसिला सुरू होता. एकदा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले. पण त्यानंतर देखील प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू होत्या.”

ते पुढे म्हणाले की, “आठ वाजता एक बैठक बोलवण्यात आली होती, पण अजित पवार त्या बैठकीला उपस्थित नव्हते. आम्हाला असं वाटलं की ते कदाचित इतर कामात अडकलं असतील. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्हीवर पाहिलं, तेव्हा समजलं की अजित पवारांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर मी तातडीने शरद पवारांकडे गेलो आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं की, आपल्याला मजबुतीने उभं राहावं लागेल.”

छगन भुजबळ यांनी या सर्व घटनांचा संदर्भ देत, धनंजय मुंडे यांच्या आरोपांवर उत्तर दिलं.