Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत संबंध तोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूर सरकारमधून जेडीयूने पाठिंबा काढून घेतल्याने केंद्रातील मोदी-शहा यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
मणिपूरमधील जेडीयूचा पाठिंबा काढण्याचा निर्णय
मणिपूर विधानसभेत 60 जागांपैकी जेडीयूकडे सुरुवातीला 6 आमदार होते. मात्र, त्यातील 5 आमदार भाजपने आपल्या गोटात सामील केले, ज्यामुळे जेडीयूचा फक्त एकच आमदार उरला. तरीही जेडीयूने भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, मणिपूरमधील हिंसाचार आणि भाजपच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत जेडीयूने आता पाठिंबा काढून घेतला आहे.
बिहार निवडणुकीच्या तयारीचा डाव
जेडीयूच्या या निर्णयामुळे मणिपूरमध्ये भाजप सरकार संकटात येणार नसले तरी बिहार निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नितीश कुमार यांनी जागावाटपात भाजपवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर जेडीयूला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. आगामी निवडणुकीत भाजप आणि आरजेडीला टक्कर देण्यासाठी नितीश कुमारांनी तयारी सुरू केली आहे.
तेजस्वी यादव यांनी दिले मतभेदाचे संकेत
आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी जेडीयूसोबत पुन्हा युती करण्याच्या शक्यतांना फेटाळून लावत, नितीश कुमार यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे नितीश कुमार यांना नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
मुख्यमंत्रीपदावरून नाराजी
महाराष्ट्र निवडणुकीनंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद कायम ठेवले नाही, याचा धडा घेऊन जेडीयू नेत्यांमध्येही नाराजी पसरली आहे की, निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवणार नाही. त्यामुळेच नितीश कुमार एनडीए आघाडीतून बाहेर पडून इंडिया आघाडीत सामील होण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा आहे.
बिहारमध्ये नितीश कुमारांचा मोठा डाव
2024 च्या निवडणुकीत जेडीयूने आपली गमावलेली ताकद परत मिळवण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमारांनी राजकीय आकडेमोड करत, मोठ्या रणनीतींसह विरोधकांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आगामी निर्णयांवर बिहारच्या राजकारणाचा पुढील मार्ग अवलंबून असेल.