ताज्या बातम्याराजकारण

Arvind Sawant : दिल्लीत वेगवान राजकीय हालचाली! अरविंद सावंतांच्या घरी ८ जणांची वज्रमूठ, मात्र ‘तो’ खासदार अनुपस्थित

Arvind Sawant : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सकाळपासूनच जोर धरू लागल्या होत्या. मात्र, अवघ्या काही तासांतच ठाकरे गटाच्या नऊही खासदारांनी एकत्र येऊन या चर्चांना पूर्णविराम दिला. “आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठाम आहोत,” असे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत “ही फक्त अफवा असून आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत आहोत,” असे ठणकावून सांगितले. संजय दीना पाटील कामात व्यस्त असल्यामुळे अनुपस्थित होते, असे स्पष्ट करण्यात आले.

राजकीय वादळ उठवण्याचा प्रयत्न – अरविंद सावंत यांचा आरोप

अरविंद सावंत यांनी या चर्चांचा समाचार घेत “सरकारमधील गोंधळावरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी जाणीवपूर्वक सकाळी सात वाजता या अफवा पसरवल्या गेल्या,” असा आरोप केला. “ज्यांच्या सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत, मंत्री अडचणीत आहेत, तेच अशा बातम्या पसरवत आहेत,” असेही ते म्हणाले.

“टायगर अभी जिंदा है!”

काल ठाकरे गटाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी नऊही खासदार हजर होते, आणि आजही ते एकत्र आल्याचे दाखवत “आमची वज्रमूठ कायम आहे, टायगर अभी जिंदा है,” असा संदेश त्यांनी दिला. संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत “तेच भाजपमध्ये जाणार आहेत, ही केवळ वेळेची गोष्ट आहे,” असा टोला लगावला.

“आम्ही कुठेही जाणार नाही!”

“कुठलेही राजकीय चढउतार आले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. आम्ही पक्ष सोडणार असल्याच्या अफवा कुठल्या आधारावर पसरवल्या जात आहेत, हे त्यांनीच सांगावे,” असे सावंत म्हणाले. संजय दीना पाटील यांच्या अनुपस्थितीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी, ठाकरे गटाने “आम्ही सर्वजण एकत्र आहोत,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

Related Articles

Back to top button