ताज्या बातम्याराजकारण

Uddhav Thackeray : ‘जर फोडाफोडी कराल तर तुमचं टाळकं फोडल्याशिवाय राहणार नाही, हिंमत असेल तर…’, ठाकरेंचं शिंदेंना ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हिम्मत असेल तर शिवसेना फोडून दाखवा. मात्र, सरकारी यंत्रणेचा वापर करून नव्हे, तर थेट आमच्यातल्या लोकांना तोडून दाखवा,” असं ठाकरे यांनी स्पष्ट आव्हान दिलं.

“फोडाफोडीत तुमचंच डोकं फुटेल!”

शिवसेनेचे सात-आठ खासदार फुटणार असल्याची अफवा पसरवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं. “बघा, हिंमत असेल तर फोडून दाखवा. पण शिवसैनिकांचा संयम अजून तुटलेला नाही. जर तुम्ही फोडाफोडी सुरू केली, तर तुमचंच डोकं फुटेल,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.

“सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मगच फोडून दाखवा!”

ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना म्हटलं, “ईडी, सीबीआय, पोलीस आणि इन्कम टॅक्सच्या जोरावर फोडाफोडी केली, तर ती खरी ताकद नाही. हिंमत असेल तर हे सगळं बाजूला ठेवा आणि माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखवा!”

“शिंदे गट म्हणजे लाचार सेना!”

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करत त्यांना “लाचार सेना” असं संबोधलं. “नेता हा प्रेरणादायी असावा लागतो. पण हे नेते कोण? त्यांना डोकं नाही, मग फक्त दाढी खाजवतात! अशा नेत्यांकडून कोण प्रेरणा घेणार?” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

“दिल्लीचा टॉर्च बंद झाला की अंधारात हरवतील!”

शिंदे गटावर हल्ला करताना ठाकरे म्हणाले, “काजवा जरी छोटा असला तरी स्वतःचा प्रकाश असतो. पण हे नेते दिल्लीतून येणाऱ्या टॉर्चच्या उजेडावर अवलंबून आहेत. तो टॉर्च बंद झाला की अंधारात कुठे जातील, तेच त्यांना कळणार नाही.”

“पुण्यात रोग पसरतोय, पण जबाबदार कोण?”

पुण्यात पसरत असलेल्या GBS आजारावर बोलताना ठाकरे म्हणाले, “दूषित पाण्यामुळे पुणेकर आजारी पडत आहेत. पण जबाबदार कोण? महापालिका विसर्जित झाली, महापौर नाहीत, पण नगरविकास खातं सांभाळणारे तरी कुठे आहेत? काही मिळालं नाही की गावात जाऊन रेडा कापतोस!”

शिवसेनेचा वाद चिघळणार?

उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता शिंदे गट या टीकेला काय प्रत्युत्तर देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Back to top button