Delhi : देशभर हिट झालेला पॅटर्न भाजपने दिल्लीत बदलला; मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या रेखा गुप्ता कोण?

Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ११ दिवसांनी, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनणार आहेत. भाजपने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेवर पुनरागमन केले असून, रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची धुरा सांभाळली जाणार आहे.
रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा
रेखा गुप्ता या उद्या रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शालीमार बाग मतदारसंघातून निवडून आलेल्या गुप्ता यांनी २९,५९५ मतांच्या मोठ्या फरकाने आम आदमी पक्षाच्या बंदना कुमारी यांचा पराभव केला.
भाजपचा नवा पॅटर्न – महिला नेतृत्वाला संधी
सध्या भाजपच्या २१ राज्यांमध्ये सत्ता आहे, मात्र एका राज्यातही महिला मुख्यमंत्री नव्हती. त्यामुळे दिल्लीतील सत्तास्थापनेसाठी भाजपने मोठा निर्णय घेत रेखा गुप्ता यांना संधी दिली आहे. त्यांच्या दांडग्या संघटन कौशल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.
राजकीय कारकीर्द आणि अनुभव
हरियाणातील जिंद येथे जन्मलेल्या रेखा गुप्ता विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. मेरठ विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे जुने संबंध आहेत. त्या उत्तर दिल्लीच्या महापौर म्हणूनही कार्यरत होत्या, त्यामुळे प्रशासन चालवण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि महिला मोर्चाच्या महासचिव आहेत.
पराभवाचा धडा आणि विजयाची चमक
२०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी आपच्या बंदना कुमारी यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला. आज त्या थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.
या ऐतिहासिक निर्णयामुळे दिल्लीच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.