ताज्या बातम्याराजकारण

Uddhav Thackeray : ‘वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता…’, निष्ठावंत सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या फुटीनंतर एकापाठोपाठ एक धक्के सहन करत आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःला “धक्काप्रूफ” झाल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षातील बंडखोरी आणि नेतृत्त्वावरील सातत्यपूर्ण आव्हानांमुळे ठाकरे गटासाठी कठीण काळ सुरू आहे.

“मी धक्काप्रूफ झालो” – उद्धव ठाकरेंचा टोला

“जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही, तर लोकांना आश्चर्य वाटते. तसंच माझं झालं आहे. वारंवार धक्के बसल्यामुळे आता मी धक्काप्रूफ झालोय,” असं ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा उल्लेख केला.

यासोबतच, “कितीही धक्के दिले तरी मी मागे हटणार नाही. उलट, योग्य वेळी एक मोठा धक्का देईन, की समोरचा उठूच शकणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

पक्ष सोडणाऱ्यांची मालिका सुरूच

शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच माजी आमदार राजन साळवी आणि शिवसैनिक जितेंद्र जनावळे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे पक्षातील गळती अद्याप थांबलेली नाही.

यासोबतच, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शाखानिहाय कामं पूर्ण करण्याचा आणि तयारीला लागण्याचा सल्ला दिला आहे.

शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देत, “जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा होता, तेव्हा वेळ दिला नाही. आता त्याचा काही उपयोग नाही,” असा टोला लगावला.

उद्धव ठाकरेंचा निर्धार स्पष्ट

सततच्या पक्षफुटी आणि राजकीय धक्क्यांमुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले असले, तरी त्यांनी स्वतःला तयार असल्याचे संकेत दिले आहेत. धक्क्यांना सामोरे जाण्याची तयारी झाली असून, योग्य वेळी प्रतिउत्तर दिले जाईल, असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे.

Related Articles

Back to top button