ताज्या बातम्याक्राईमराजकारण

Eknath Shinde : प्रेम, मृत्यू आणि बदला! एकनाथ शिंदेंना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमागील वेगळाच प्रकार आला समोर

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे दिल्यानंतर, मुंबई आणि अकोला एटीएस तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन जणांना अटक केली.

ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे करण्यात आली. गुरुवारी रात्री ताब्यात घेतलेल्या दोघांना शुक्रवारी सकाळी मुंबईला नेण्यात आले. तपासात या धमकीमागे वैयक्तिक वाद असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

मंत्रालयाला मिळाला धमकीचा ई-मेल

गुरुवारी मंत्रालयाला एक ई-मेल मिळाला, ज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. हा मेल मिळताच पोलिस सतर्क झाले आणि मुंबई-अकोला एटीएस तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला.

देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष महल्ले, सहायक निरीक्षक हेमंत शिंदे, मुंबई गुन्हे शाखेचे एपीआय विजय रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी देऊळगाव मही येथे छापा टाकला आणि अभय शिंगणे (२५) आणि मंगेश वायाळ या दोघांना ताब्यात घेतले.

मोबाईल चार्जिंगच्या दुकानातून मेल पाठवला

अभय शिंगणे आणि मंगेश वायाळ यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात समोर आले की, मंगेशने आपला मोबाइल अभयच्या दुकानात चार्जिंगला लावला होता. त्याच मोबाइलवरून हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला.

विशेष म्हणजे, मंगेशच्या ई-मेल आयडीवरून हे पहिल्यांदाच मेल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्याने मेल पाठवला की त्याचा वापर करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

प्रेमप्रकरणातून सुडाचा कट?

प्राथमिक चौकशीत, अभय शिंगणेच्या प्रेयसीचा मृत्यू झाला होता, आणि त्याला त्यासाठी जबाबदार धरून मंगेश वायाळ वारंवार त्याच्याशी वाद घालत होता. सततच्या शिवीगाळीला कंटाळून मंगेशला धडा शिकवण्यासाठी अभयने त्याच्या मोबाईलचा वापर करून हा बनावट ई-मेल पाठवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आरोपींच्या नातेसंबंधांचा तपास सुरू

माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. अभय आणि मंगेश हे आतेभाऊ-मामेभाऊ असल्याचे समोर आले आहे. मंगेश हा अल्पशिक्षित असून, अभय बारावीपर्यंत शिकलेला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, खरा मास्टरमाइंड कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

Related Articles

Back to top button