Konkan : कोकणात ठाकरे गटाला पुन्हा भगदाड? ‘हे’ बडे नेते शिंदेंच्या गळाला, शिवसेना नेत्याचा मोठा दावा
Konkan : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठा दावा करत कोकणातील उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आणि सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. यानंतर आणखी काही मोठे नेते शिंदे गटात येणार असल्याचे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटाचा डॅमेज कंट्रोल सुरू
या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, नेत्यांना पक्षाशी बांधून ठेवण्यासाठी डॅमेज कंट्रोल सुरू केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, त्याचवेळी मंत्री भरत गोगावले यांनी नाईक शिंदे गटात जाणार असल्याचा दावा करत, ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे.
एसीबी चौकशी आणि राजकीय हालचाली
माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) चौकशीचा दबाव वाढला होता, त्यामुळे त्यांनी काही वेळा उद्धव ठाकरेंना भेटून शेवटी शिंदे गटात प्रवेश केला. आता आमदार वैभव नाईक यांच्यावरही एसीबी चौकशीचा ससेमिरा असल्याने, ते कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण त्यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले असले तरी, शिंदे गटातून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भरत गोगावले यांचा मोठा दावा
ठाकरे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ची धास्ती घेतली आहे का? या प्रश्नावर मंत्री भरत गोगावले म्हणाले,
“जर उद्धव ठाकरे यांनी आधीच योग्य पावले उचलली असती, तर ही वेळ आली नसती. मात्र, एकनाथ शिंदेंनी सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली, त्यामुळेच लोकांचा विश्वास वाढला आणि नेते आमच्या गटात येत आहेत. येत्या आठवड्यात कोकणातील अनेक नेते शिंदे गटात येणार आहेत.”
अद्याप सर्व गोष्टी गुलदस्त्यात
भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा सुरू आहे, मात्र सर्व तपशील योग्य वेळी उघड केले जातील. तसेच, “एसीबी चौकशी सुरू आहे, याचा अर्थ कोणी आरोपी ठरत नाही,” असेही त्यांनी सांगितले.
राजकीय घडामोडींना वेग
या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटातील नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. पुढील काही दिवसांत कोकणातील अनेक महत्त्वाचे राजकीय बदल घडण्याची शक्यता आहे.