Sujit Minchek : आधी ठाकरेंना सोडलं, आता ‘स्वाभिमानी’लाही दिला झटका, कोल्हापूरच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय

Sujit Minchek : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक नवीन चेहरे दाखल होत आहेत. महाविकास आघाडीतील काही नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरु असल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

माजी आमदार सुजित मिंचेकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांनी मिंचेकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. मात्र, पक्षात नाराजी वाढल्याने आणि आगामी राजकीय भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मिंचेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने कोल्हापुरात शिवकार्य अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही पार पडल्या. यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यात चर्चा झाली. मात्र, राजू शेट्टी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मिंचेकर यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होण्यासाठी मिंचेकर यांची तयारी सुरू आहे. “राजकीयदृष्ट्या निष्क्रिय बसण्यापेक्षा सक्रिय राहणे चांगले,” असे त्यांनी स्पष्ट केले. 27 फेब्रुवारीला मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.