ताज्या बातम्याक्राईम

Dattatray Gade : काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड, तरुणी घाबरल्याने गाडे निर्ढावला, पुन्हा तोडले शरीराचे लचके

Dattatray Gade : पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील ऊसाच्या फडात शोधमोहीम राबवून पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, अटकेनंतर हा नराधम आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न करत असून, त्याने तरुणीने स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवले आणि त्यासाठी पैसे घेतले, असा दावा केला आहे.

पीडितेचा जीव वाचवण्यासाठी लढा

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडेने शिवशाही बसमध्ये कोणीही नसल्याचे पाहताच दरवाजे बंद केले आणि पीडितेने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच तिला जबरदस्तीने सीटवर ढकलले. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर गेला नाही. यावेळी गाडेने तिचा गळा आवळून तिला धमकावले आणि अत्याचार केला.

या भीषण प्रसंगात तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर ती घाबरली असून प्रतिकार करणार नाही, हे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला. “माझा जीव तरी वाचवा,” अशी तिची याचना होती, ज्याचा फायदा घेत गाडेने तिच्यावर पुनःश्च अत्याचार केला.

गाडेचा गुन्हेगारी इतिहास उघड

पोलिस तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे की, दत्तात्रय गाडे याने यापूर्वीही एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र, भीतीपोटी तिने फक्त चोरीची तक्रार दिली होती. शिवाय, गाडे हा शिवाजीनगर, शिरूर आणि स्वारगेट एसटी स्टँडवर फिरत महिलांना सावज बनवण्याचा प्रयत्न करायचा, अशी कबुली त्याने दिली आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या संशयावरून त्याला ताब्यात घेतले होते, मात्र त्याच्या कुटुंबाने त्याचे बचावाचे नाटक केले. आताही त्याची पत्नी आणि कुटुंबीय त्याला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलिस तपासातील पुराव्यांमुळे गाडेच्या निर्लज्ज खोटेपणाचे बुरखे फाडले गेले आहेत.

पुणे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, दत्तात्रय गाडेवर कठोर कारवाईची मागणी समाजातून केली जात आहे.

Related Articles

Back to top button