Valmik Karad : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात नवे पुरावे समोर आले असून, या प्रकरणातील सीआयडी तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अवघ्या तीन महिन्यांत तपास यंत्रणांनी हे प्रकरण कोर्टात पोहोचवले असून, आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
संभाषणातून धक्कादायक माहिती
या हत्येच्या कटातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्या फोनवरील संभाषणाची माहिती समोर आली आहे. या संभाषणात तो अन्य आरोपींना (सुनील शिंदे आणि विष्णू चाटे) हत्येनंतर तातडीने घटनास्थळ सोडण्याच्या सूचना देत असल्याचे आढळले आहे.
संभाषणातील महत्त्वाचे अंश:
वाल्मिक कराड: “अरे ते बंद ठेवा, चालू केलं तर वातावरण गढूळ होईल.”
सुनील शिंदे: “बरं अण्णा.”
वाल्मिक कराड: “ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, त्याच परिस्थितीत बंद करा. दोन मिनिटांत सगळं मिटवा आणि लगेच सुटा.”
या संभाषणातून आरोपींनी हत्येच्या आधी आणि नंतर कशी योजना आखली होती, हे स्पष्ट होत आहे.
नवीन पुराव्यांमुळे तपास अधिक मजबूत
माध्यमांना प्राप्त झालेल्या पुराव्यांमध्ये या निर्घृण हत्येचे फोटोही समोर आले आहेत. या नव्या पुराव्यांमुळे तपासाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यामुळे या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.