मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा रंगली होती.
अजित पवार यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लावण्यात आले होते. तसेच अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असे ट्विट केले होते.
अमोल मिटकरी यांच्या या ट्विटमुळे अजित पवार मुखमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कधीही पदावरुन काढण्यात येईल असे सातत्याने सांगण्यात येत होते. असे असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक ट्विट चर्चेत आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोदींनी एक मराठीतून ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतूक केले आहे. मोदींचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा थांबल्या आहेत. तसेच मोदींनी कौतूक केल्यामुळे शिंदे गटाचे राजकीय वजनही वाढले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असे म्हणणाऱ्या आमदारांसाठी हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.