डुप्लिकेट चावी, लॉकर अन् पिस्तुल, घोसाळकरांच्या हत्येचा सगळा फूलप्रूफ प्लान आला समोर….

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या अंगरक्षाकाच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता.

त्याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचे पिस्तुल वापरले होते. मिश्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिश्रा त्याच्याकडे असलेले पिस्तुल मॉरिसच्या कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवायचा. त्याची डुप्लिकेट चावी मॉरिसने तयार करुन घेतली होती, पोलीस चौकशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी मॉरिसची पत्नी सरीनाचा जबाब काल नोंदवला. त्यातूनही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्यानं महत्त्वाच्या पक्षांकडून तिकिट मिळतंय का याची चाचपणी केली. पण बलात्काराचा आरोप असल्याने कोणताही पक्ष त्याला तिकिट देण्यास तयार नव्हता.

बलात्कारासह मॉरिसवर आणखी दोन केसेस होत्या. मॉरिसच्या मनात अभिषेक यांच्याबद्दल राग होता. त्याला सूड घ्यायचा होता, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली.  अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, असेही सांगितले जात आहे. नंतर ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांचं कौतुक केले.